JNMS, JNMS | Jagadgurushree - Jagadguru Shikavan

-- स्वामीजींचे शिकवण --

या चराचरात परमात्मा आहेच, तो निर्गुण आहे, गतिमान आहे, अव्यक्त आहे. त्याला रंग, रूप, आकार, नसून तो एक चैतन्य आहे. सर्वच साधक त्याला जाणू शकत नाहीत. म्हणून तोच प्रत्येक जीवमात्राच्या शरीरात प्रवेश करून संपूर्ण सृष्टी चालवतो. सगूण हे दृश्य रूप आहे. त्यामुळे बद्ध, मुमुक्षु साधक त्या माध्यमातून त्या परमात्म्याला समजून घेऊ शकतो. तर सिद्ध हा उच्च पातळीतील व्यक्ती असल्याने त्याची इंद्रिये अंतर्मुख झालेली असतात.

त्यामुळे तो जे ब्रम्हांड आहे तेच आपल्या पिंडात आहे हे अंत:चक्षूनी पाहू शकतो. बद्ध, मुमुक्षु, साधक या वर्गासाठी देवाचे माध्यम सगुण आहे तर सिद्धासाठी निर्गुण हे माध्यम आहे. यासाठीच संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हंटले आहे, तुज सगुण म्हणो की निर्गुण रे| सगूण - निर्गुण एकू गोविंदु रे|

हिंदूधर्माला फार मोठी ग्रंथसंपदा लाभलेली आहे. चार वेद (अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद आणि आयुर्वेद). अठरा पुराणे (ब्रम्हपुराण, विष्णूपुराण, शिवपुराण, गरूडपुराण, वराहपुराण, मत्स्यपुराण, पद्मपुराण, कुर्मपुराण, वामनपुराण, भविष्यपुराण, लिंगपुराण, ब्रम्हवैवर्तपुराण, स्कंदपुराण, अग्निपुराण, नारदपुराण, सौरपुराण, गणेशपुराण, ब्रम्हांडपुराण).

सहा शास्त्रे (व्याकरण, छंद, निरूक्त, ज्योतिष, शिक्षा, कल्प) उपनिषदे, ब्राम्हणके, अरण्यके, संहिता अशाप्रकारे प्राचीन ग्रंथसंपदा आहे.
याशिवाय महाभारत, रामायण, गीता असे अनेक तत्त्वज्ञान शिकविणारे धर्मग्रंथ आहेत. धर्मसिंधु, निर्णयसिंधु हे माणसाने प्रसंगात कसे वागावे? अशी माहिती देणारे अत्यंत मौलीक ग्रंथ आहेत.

याशिवाय या धर्माला थोर मोठ्या ऋषींची परंपरा आहे. या ऋषीमुनींनी अनेक प्रकारचे शोध त्या काळी लावलेले आहेत. जे आजच्या आधुनिक जगाला थक्क करू पाहणारे आहेत. अगदी टेस्टट्युब बेबीपासून अणूंपर्यंत, कालगणनेपासून ब्रम्हांडाच्या उत्पत्ती पर्यंतचे अनेक शोध आपल्या हिंदू संस्कृतीच्या वाड़्मयात वाचावयास मिळतील. या धर्माला थोर गुरू - शिष्य परंपरा आहे. सत्य, धर्म, अहिंसा, प्रेम हे या धर्माचे तत्वज्ञान आहे. या धर्मात शरणागताला अभय देण्याचा प्रघात आहे. या धर्मात पाप - पुण्याला अनन्य साधारण महत्व आहे.

सकाळी उठल्यावर पहिला श्‍वास परमेश्‍वराच्या नामस्मरणाने घ्या आणि संपुर्ण दिवसभर त्याच्यावर पुर्ण विश्‍वास ठेवून सवर् कर्मे पारदर्शी निर्भयपणे करा. दुसर्‍याला उपद्रव ठरेल असे कोणतेही कृत्य करण्याचे मनाला शिवू देवू नका. परमेश्‍वराला साक्षी ठेवून सद्सद्विवेक बुध्दीने जे जे कर्म कराल, त्या - त्या कर्माला तो साक्षी आहे. कर्माच्या फलनिष्पत्तीनुसार तुमचे कर्म तुम्हाला मृत्यूनंतरफेडायचे आहे.

अबालवृध्दांची सेवा करा, अनाथांची सेवा करा, अपराधाची कबुली द्या, धर्माभिमानी रहा, खोटी शपथ घेवू नका, दान धर्म करा, परमेश्वराजवळ सकाळ संध्याकाळ प्रार्थना करा. न्याय व नितीने वागा, कष्टाने कमवा, आई वडील, गुरूजन, जेष्ठ यांचा मान राखा, त्यांची आज्ञा पाळा, वृध्दापकाळी त्यांचा सांभाळ करा, शेजार धर्म पाळा, दुसर्‍याला मदत करण्याची, परोपकाराची वृत्ती ठेवा.

सत्संग, प्रवचने, किर्तने, कथा मन:पुर्वक ऐका. देशाचे, धर्माचे, आपल्या प्रार्थना स्थळांचे प्राणापलीकडे जतन करा. ज्याजोगे तुम्ही सुसंस्कारीत, बलवान, निर्भय होवू शकाल.


॥तुम्ही जगा, दुसर्‍याला जगवा॥